राज ठाकरेंनी साधला '9'चा मुहूर्त
Monday, January 29, 2007

शिवसेनेचे बंडखोर नेते राज ठाकरे यांनी गुरुवारी ' महाराष्ट्र नवनिर्माण सेना ' या नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा करत ' 9 ' चा मुहूर्त साधलाच. ' जग बदललेय , त्याबरोबर महाराष्ट्रानेही बदलायला हवे ', अशी पक्षाची भूमिका मांडत , त्यांनी निळा , हिरवा , पांढरा आणि भगवा रंग असणारा सर्वसमावेशक असा ' पक्षध्वज ' जाहीर केला. विशेष म्हणजे राज यांनी शड्डू ठोकत , आपला पक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली.
सकाळीच घरी छोटी पूजा करून आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन राज यांनी भरदुपारी सव्वाबारा वाजता पत्रकार परिषदेत नव्या पक्षाची घोषणा करताच प्रमुख कार्यकतेर् आणि पत्रकारांनी खचाखच भरलेल्या चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात टाळ्या आणि घोषणांचा गजर झाला. त्यानंतर लगेचच नाट्यमयरीत्या मागचा पडदा वर जाऊन ' महाराष्ट्र नवनिर्माण सेना ' ही अक्षरे चौरंगी झेंड्यासोबत अवतरली. ' इतके दिवस मी उत्सुकता ताणण्याची मजा घेत होतो असे नाही , उलट तुम्ही सगळे प्रसुतिगृहाबाहेर होतात , माझ्या कळा मला माहित ', अशा शब्दांत राज यांनी प्रास्ताविक मांडले.

आपण विकत घेतलेल्या कोहिनूर गिरणीच्या जमिनीवर निर्माण होणाऱ्या रोजगारात कोहिनूरच्या कामगारांच्या वारसांना सामावून घेण्यात येईल , असा खुलासा करतानाच अन्य गिरण्यांमध्येही हे घडावे , यासाठी आपला आग्रह असेल , असे त्यांनी सांगितले. ' गिरण्यांचा संप मी घडवून आणला नव्हता. झालेली घटना दुदैर्वी आहे... सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आजपर्यंत आपण मानत आलोय... जमिनी विकायला मी लावले नाही. कामगारांना देशोधडीला मी लावले नाही. जे केले ते राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि एनटीसीने. याचे उत्तरदायित्त्व माझ्यावर कसे ? विकास हा होणारच आहे , असे घडणारच आहे , पण इथे राहणाऱ्या माणसाला स्वत:चे स्थान मिळायलाच हवे ,' अशी भूमिका त्यांनी गिरणजमीनविक्रीबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशासंदर्भात मांडली. बाळासाहेबांच्या आपल्या-वरील वैयक्तिक टीकेला आपण कधीही उत्तर देणार नाही , असे राज यांनी टाळ्यांच्या कडकडात जाहीर केले. नारायण राणे यांना तुमच्या पक्षात घेणार का , असे विचारता ते उत्तरले ' मी कोणालाही आमंत्रण देणार नाही , पण कोणी आले तर त्याचे स्वागत करू , मान ठेऊ. '

टीव्हीच्या पत्रकारांनी वारंवार हिंदीतून प्रश्न विचारूनही राज जाणीवपूर्वक मराठीत उत्तरे देत होते. पक्षाची ध्येयधोरणे , झेंड्याच्या रंगांचे अर्थ , महाराष्ट्र , मराठी माणूस , परप्रांतीय , हिंदुत्व या विषयांवरची भूमिका 19 तारखेला शिवाजी पार्कच्या सभेत आपण मांडू , तसेच पक्षसंघटनेची रचना , पक्षाच्या आघाड्या , पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका , अन्य पक्षांशी युती यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
 
posted by Rohit at 3:01 AM | Permalink |


0 Comments: