भाजपलाही मनसेने मागे टाकले...
Monday, February 5, 2007
ठाण्यात आम्ही राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपपेक्षाही अधिक मते मिळवली. आमची कोणाशी युती नव्हती. समोर चार मोठे पक्ष असताना पहिल्याच प्रयत्नात ठाणेकरांनी आमचे तीन उमेदवार निवडून दिले. इतर वॉर्डातही मतदारांनी चांगला विश्वास दाखवला. त्यामुळे या निकालांबाबत मी समाधानी आहे. ठाणेकरांना शब्द दिल्याप्रमाणे १५ दिवसांतले दोन-तीन दिवस ठाण्यात येऊन मी स्वत: इथल्या प्रश्नांकडे लक्ष देणार आहे, अशी ग्वाही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. मटाला दिलेल्या खास मुलाखतीत ठाण्यातील मनसेच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले.

युती ठाण्यात सत्तेच्या जवळ असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही इतर पक्षांना बरोबर घेऊन बहुमताचे गणित जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मनसेची साथ मिळाल्याशिवाय हे गणित पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे मनसे आघाडीबरोबर जाईल का, मनसेचे नगरसेवक वेगळे अस्तित्व कसे सिद्ध करतील, राज स्वत: ठाण्यासाठी किती वेळ देणार आहेत, ठाण्यात पक्षाच्या वाढीसाठी काय प्रयत्न होणार, या साऱ्या प्रश्ानंना राज ठाकरे यांनी मनमोकळी उत्तरे दिली.

ठाण्यात कोणाबरोबर जायचे याचा विचार मी आता केलेला नाही. कोणाशीही माझे बोलणे झालेले नाही. सध्या पक्ष वाढवण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत. ठाण्याची सत्ता दिलीत तर १५ दिवसांतले दोन दिवस मी ठाण्यात थांबून विकासावर लक्ष ठेवेन, असे मी सांगत होतो. हे केवळ निवडणुकीत बोलण्यापुरते नव्हते. सत्तेत आलो नसलो तरी ठाणेकरांनी जो विश्वास दाखवला तो खरा करण्यासाठी ठाण्यावर मी अधिक लक्ष देणार आहे. त्याची सुरुवातही मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केल्याचे राज म्हणाले.

मनसेचे नगरसेवक वेगळेपण कसे दाखवतील, या प्रश्ानवर लवकरच विजयी उमेदवारांची बैठक होत असून त्यात या सर्व गोष्टींवर चर्चा होईल, असे राज यांनी सांगितले. निवडणुकीतून घराघरात पोहोचलेले उमेदवार यापुढेही काम सुरू ठेवतील. आपल्या कामातून लोकांचा पक्षावरील विश्वास अधिक दृढ करणे हाच आमचा अजेंडा असेल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक यासह इतर महापालिकांमधील कामांचा आराखडा आणि पक्ष वाढवण्यासाठी राज ठाकरे यांनी दौरेही सुरू केले आहेत. रविवारीचे ते नाशिकला रवाना झाले.
 
posted by Rohit at 9:02 AM | Permalink |


0 Comments: