मनसेचा धोका कोणाला?
Wednesday, January 31, 2007
स्थापना झाल्यापासून अवघ्या नऊ महिन्यांतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. पक्ष नवा असला, तरी राज ठाकरे लोकांच्या मनातीलच भावना बोलत असल्याने या पक्षापासून सर्वच पक्षांना सावध राहावे लागेल, अशी चिन्हे आहेत...

महापालिका निवडणुकीच्या मतदानाला नऊ दिवस शिल्लक आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांना ओरबाडे काढत परस्परांच्या विरोधात लढत आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती असली तरी अनेक वॉर्डांत आपल्या वाट्याला जागा मिळाली नाही म्हणून अंतर्गत धूसफूस आहे. चिल्ल्यापिल्ल्या पक्षांनी तिसरी आघाडी पोखरून गेली आहे. राज ठाकरे यांनी स्थापन केलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नऊ महिन्यांचा नवा पक्ष प्रथमच निवडणुकीला सामोरे जात आहे.

राज्यातील सर्व ११ महापालिकांमध्ये मनसेने रिंगणात उडी घेतली आहे. मुंबईतील २२७पैकी २२५ वार्डांत मनसेचे उमेदवार उभे आहेत. मनसेचे ठाण्यात ७९, पुण्यात १२०, पिंपरी-चिंचवडमधे ५२, नाशिकमधे १०५, अकोल्यात ४०, सोलापूरमधे २६ उमेदवार उभे आहेत. नागपूर व अन्यत्र ५० टक्के जागा मनसे लढवत आहे. मुंबईत मनसेने कोठेही कुणाबरोबर समझोता केेलेला नाही. जास्तीत जास्त जागा लढवल्यामुळे मनसेची ताकद कुठे कमी- जास्त आहे हे समजू शकेल आणि त्या आधारावर राज यांना संघटना बांधणीचा पुढील कार्यक्रम आखता येईल. अर्धा डझन वॉर्ड वगळता बहुतेक ठिकाणी मनसेच्या उमेदवारांना मुंबईत रेल्वे इंजिन हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. मुलंुडसारख्या ठिकाणी मनसेला कपबशी; तर कुर्ल्याला दोन ठिकाणी कोरी पाटी हे चिन्ह मिळाले आहे. १९६६ साली स्थापन झालेल्या शिवसेनेने पहिली निवडणूक लढवली होती, तेव्हाही सेनेला वेगवेगळ्या वॉर्डांतून वेगवेगळी निवडणूक चिन्हे मिळाली होती. राजकीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता मिळविण्यासाठी किमान सहा टक्के मते मिळायला हवीत. राज ठाकरे यांनाही मनसेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी महापालिका निवडणुकीत सहा टक्के मते प्राप्त करावी लागतील. त्यानंतरच मनसेला कायम स्वरूपी निवडणूक चिन्ह मिळू शकेल. येत्या निवडणुकीत पक्षाला जास्तीत जास्त मते मिळवून मुंबईसह प्रत्येक महापालिकेत प्रवेश करणे व अन्य पक्षांना दखल घ्यावी अशा संख्येने उमेदवार निवडून आणणे हे मनसेपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. मनसे हा राजकारणातील कोरा चेक आहे, त्यामुळे जिंकणारी प्रत्येक जागा हा मनसेचा बोनस ठरणार आहे.

शिवसेनेचा जन्म १९६६मध्ये झाला. शिवसेना कशी वाढली, महापालिकेत व राज्यात सत्तेवर कशी आली हा तर ताजा इतिहास आहे. १९९९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली; पण हा पक्ष स्थापन करणारे शरद पवारांसह सर्वच दिग्गज नेते अनुभवी होते. सेनेच्या स्थापनेनंतर ४० वर्षांनी खऱ्या अर्थाने नवा पक्ष स्थापन होताना आणि नऊ महिन्यांतच निवडणुकीला सामोरे जाताना बघायला मिळत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, तेव्हा ते ४० वर्षांचे होते. मनसेची स्थापना करणारे राज ३८ वर्षांचे आहेत. मुंबईच्या चाळीचाळीतून आणि नाक्यानाक्यांवर पायपीट करून बाळासाहेबांनी शिवसेनेची बांधणी केली. आज राजही पायाला भिंगरी लावल्यासारखे मुंबई आणि राज्यात सर्वत्र फिरत आहेत. वडील काँग्रेसमध्ये आणि मुले शिवसेनेत अशी काही काळ परिस्थिती होती. आता वडील शिवसेनेत आणि मुले मनसेत असे दृश्य दिसू लागले आहे. मनसैनिक हा गल्लीबोळात दिसला पाहिजे, सार्वजनिक कामात आघाडीवर असला पाहिजे, यासाठी राज आग्रही आहेत.

राज यांच्याविषयी तरुणवर्गाला मोठे आकर्षण आहे. सर्वाधिक गदीर् खेचणारा महाराष्ट्रातील नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. महिलांची उपस्थितीही लक्षणीय असते. ज्यांचा राजकारणाशी कधीही संबंध आलेला नाही, असे अनेक लोक राज यांच्या सभांना उपस्थित असल्याचे दिसतात. राज हे पुढारी किंवा नेत्यांच्या थाटात वागत नाहीत. मग्रुरी किंवा मस्ती त्यांच्या वागण्याबोलण्यात नाही. नीटनेटक्या कपड्यातले राज आपल्या मनातल्या वेदना बोलतात, असे जाणवते. शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून अनेकदा धारदार प्रहार केले. मुलाखतीतूनही सडकून टीका केली. पण राज यांनी कमालीचा संयम बाळगला आहे. बाळासाहेब मुलाखतीतून जे बोलले, तो त्यांचा अधिकार आहे, मी त्यांना कदापि प्रत्युत्तर देणार नाही. परंतु बाळासाहेबांच्या आडून कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी याद राखा, माझ्याही तोंडाचा पट्टा सुटेल, अशा शब्दात राज यांनी इशारा दिला आहे. आपल्या भाषणातून ते कोणाचा अवमान होईल असे वक्तव्य करीत नाहीत. कोणावर वैयक्तिक टीका करीत नाहीत. भावनिक मुद्याच्या आहारी जात नाहीत. मुंबईच्या विकासाचे स्वप्न ते मांडतात. राजकीय इच्छाशक्ती असेल तरच मुंबईचा विकास होईल असे ते सांगतात. आपल्याकडे तुम्हाला देण्यासाठी एकच गोष्ट आहे; ती म्हणजे इच्छाशक्ती असे सांगून ते लोकांची मने जिंकतात. सारखे रस्ते खोदायचे आणि पैसे काढायचे हे उद्योग बंद करण्यासाठी मनसेला निवडून द्या असे सांगतात. कंत्राटदार आणि नगरसेवकांचे रॅकेट आपल्याला मोडून काढायचे आहे, असे ठामपणे सांगतात. कचरामुक्त रस्ते व अतिक्रमणमुक्त फुटपाथ हवेत. एवढी अपेक्षाही करदात्या नागरिकाने या शहरात करायची नाही का, असा प्रश्न विचारून ते लोकांच्या मनाला साद घालतात.

कोणाच्या कानफटात मारून मराठीचा उत्त्कर्ष होणार नाही, कोणाचा द्वेष करून मराठी अस्मिता टिकणार नाही, हे राज ठणकावून सांगतात. बिन चेहऱ्याच्या माणसांना घेऊन राज निवडणुकीला सामोरे जात आहेत. प्रामाणिकपणा आणि संयम हीच त्यांची जमेची बाजू आहे. शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना सावध राहावे लागेल अशी परिस्थिती मनसेने निर्माण केली आहे.
 
posted by Rohit at 9:10 AM | Permalink |


1 Comments:


At July 1, 2008 at 4:28 AM, Blogger Unknown

Required Contact mail id of Maharashtra Navanirman Sena. Would like to contact Shri Raj Saheb Thakrey for some suggessions & complaints.

Vivek Joshi