बाळासाहेब माझे देव... राज ठाकरे
Tuesday, February 20, 2007
'' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे देव आहेत , देव आणि भक्त असे आमचे नाते आहे , प्रामाणिक भक्त कोण हे देवाला चांगले कळते ,'' अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज म्हणाले , '' बाळासाहेब आणि मी आमच्या दोघांच्या हृदयात परस्परांबद्दल आपुलकी असणारा एक कप्पा आहे. हृदयशून्य माणसाला तो कसा कळणार ? आमचे परस्परांशी फोनवर अनेकदा बोलणे होते. आठवडाभरापूवीर्च आमचे बोलणे झाले. मात्र , आम्ही राजकारणावर कधीच बोलत नाही. वैयक्तिक बोलतो , परस्परांची चौकशी करतो. '' बाळासाहेब मनापासून बोलतात. तीच भावना शिवसैनिकांमध्ये आहे ,'' असे राज म्हणाले. '' शिवसेनेत परत जाण्यासाठी मी दरवाजा ठोकलेला नाही. ते (उद्धव) स्वत:च माझ्याबद्दल बोलत आहेत. शिवसेनाप्रमुख , शिवसेना किंवा शिवसैनिक यांच्याशी आपले भांडण नाही. वाद आहे शिवसेना चालवत असलेल्या चार टाळक्यांशी ,'' असे राज यांनी ठणकावून सांगितले. महापालिका निवडणुकीत ' दूध का दूध आणि पानी का पानी ' असा निर्णय देऊन राज यांना मतदारांनी जागा दाखवली , अशी टीका उद्धव यांनी केली आहे. यावर राज म्हणाले , बरोबरच आहे. म्हणूनच मुंबईत शिवसेनेच्या २१ जागा कमी झाल्या. स्वत: बाळासाहेबांना घराबाहेर पडून मते मागावी लागली , यातच दूध कोणते आणि पाणी कोणते ते स्पष्ट झाले. हिंदुत्व मान्य आहे का , या उद्धव यांच्या प्रश्नावर राज म्हणाले : अशा अटी घालायला तपश्चर्या लागते. त्याने विनाकारण आव आणू नये. हे सर्व मुद्दे बाळासाहेबांचे आहेत. मनसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का ? यावर राज म्हणाले , '' ते कसला संभ्रम निर्माण करणार ? नव्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे भवितव्य काय ? या प्रश्नावर त्याच मुलाखतीत शिवसेनाप्रमुखांनी , ' माहीत नाही ' असे उत्तर दिले होते. ते पुरेसे बोलके आहे. ''
 
posted by Rohit at 4:06 AM | Permalink |


0 Comments: