मनसे ठरवणार 'नाशिक कोणाचे'
Monday, February 5, 2007
प्रस्थापितांना धक्के देत आणि सत्ताधाऱ्यांना नाकारत नाशिककरांनी महानगरपालिका निवडणुकीत दिलेला कौल शुक्रवारी स्पष्ट झाला असून, जनतेने एकूण १०८ जागांपैकी युतीच्या पारड्यात ४० आणि दोन्ही काँग्रेसना मिळून ३८ जागा दिल्या आहेत. युतीच्या २० जागा घटल्याने त्यांच्या हातून निसटलेली सत्ता दोन्ही काँग्रेसला एकत्र येऊनही बहुमताअभावी पटकावता आलेली नाही. त्यामुळे १२ जागांवर मुसंडी मारणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात नाशिकच्या सत्तेच्या दोऱ्या गेल्या आहेत. शिवाय अपक्षांनी दहा आणि इतर छोट्या पक्षांनी आठ जागा पटकावल्याने त्यांनाही चांगलाच 'भाव' राहणार आहे.

मागच्या पंचवाषिर्क निवडणुकीत १०८ पैकी ५५ जागा मिळवून निविर्वाद बहुमत मिळवणाऱ्या युतीला यावेळी सत्ता राखता आली नाही. गेल्या तीन पंचवाषिर्कपासून जोरदार गरुडभरारी घेत मागच्यावेळी ३८ जागा पटकावून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यासोबत भाजपाच्या पदरातही २२ जागा पडल्या होत्या. निवडणुकीआधी नाशिकच्या महापौरपदी भाजपाचेच बाळासाहेब सानप होते. मात्र, त्याचा काहीही फायदा भाजपाला झालेला दिसला नाही. भाजपाला केवळ १४ जागांवर समाधान मानावे लागले.

जागावाटपावरून दोन्ही काँग्रेस परस्परांच्यासमोर उभ्या ठाकल्याने त्यांना युतीच्या पडझडीचा फायदा मिळवता आला नाही. काँग्रेसला कमी लेखत स्वबळावर लढण्यासाठी जहाल भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना स्वत:चाच पराभव पहावा लागला. एकंदरीतच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार हवा असल्याचे चित्र होते. सभागृहातला सर्वात मोठा पक्ष म्हणून राकाँ पुढे तर येईलच, पण वेळप्रसंगी कुणाचीही मदत न घेता सत्ता काबीज करेल, असा होरा सगळीकडूनच व्यक्त होत होता. मात्र, मतदारांनी तो साफ चुकवला आणि राकाँचे संख्याबळ २३वरून १७वर आणून आदळले. दुसरीकडे मात्र काँग्रेस हा आहे त्यापेक्षा चार जागा अधिक मिळवणारा एकमेव पक्ष ठरला. गेल्या निवडणुकीत १७ वर अडलेली काँग्रेसची गाडी यंदा २१वर येऊन थांबली.

राज ठाकरे यांना कायमच साथ देणाऱ्या नाशिकने याही निवडणुकीत त्यांच्या पक्षाला जोरदार प्रतिसाद दिला. अवघ्या एक वर्षाच्या या पक्षाने पहिल्याच लढतीत थेट १२ जागा पटकावून खाते उघडले. या संख्याबळामुळे मनसेच्या हाती सत्तेच्या दोऱ्या आलेल्या आहेत. याशिवाय मनसेचे पाच ते सात उमेदवार अगदी कमी फरकाने पराभूत झाले आहेत. तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्यात अग्रेसर असलेल्या डॉ. डि. एल. कराड यांच्या माकपला मतदारांनी सभागृहातून हद्दपार केले आहे. या पक्षांच्या दोन्ही नगरसेवकांना नवख्या उमेदवारांकडून पराभूत व्हावे लागले आहे.

दोन्ही काँग्रेस, शिवसेना-भाजपा युती आणि मनसे यांच्यातील मतविभागणीचा फायदा उठवत फुटकळ पक्ष आणि अपक्षांनी आपापल्या सत्तेची गणिते साधून घेतली. बसपाने नाशिक महानगरपालिकेत पहिल्यांदाच तीन नगरसेवक घेऊन शिरकाव केला आहे. तर 'लोकजनशक्ती' पक्षाने राज्यातील पहिली व एकमेव जागा जिंकून सर्वांचेच लक्ष वेधले आहे. गेल्या निवडणुकीत राकाँच्या चिन्हावर नगरसेवकपद मिळवलेल्या रिपाइंच्या दोघांनी यावेळी स्वतंत्रपणे जागा जिंकून आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. समाजवादी पाटीर्, शेकाप यांनी प्रत्येकी एक जागा जिंकत हजेरी लावली आहे. तर १० अपक्षांनी विजय मिळवत स्वत:ला सिद्ध केले आहे.
 
posted by Rohit at 9:12 AM | Permalink |


0 Comments: