मनसेकडे धाडले चचेर्चे खलिते
Monday, February 5, 2007
मतदारांनी सर्वच प्रमुख पक्षांना अर्धवट संख्याबळ प्रदान करत नाशिक महापालिकेच्या सत्तेचा अंकुश मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सोपवल्याने आगामी भूमिका ठरवण्यासाठी खुद्द राज ठाकरे रविवारी रात्री नाशिकमुक्कामी दाखल झाले. नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेण्याबरोबरच राज हे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मनसेची पुढची चाल ठरवतील.

राज यांनी नाशिकशी निर्माण केलेल्या संबंधांची बूज मतदारांनी मनसेला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा देऊन राखली आहे. 'फक्त एक संधी द्या. नालायक ठरलो तर पुन्हा मत मागायला येणार नाही', या निवडणुकीपूवीर् राज्यभर घेतलेल्या भूमिकेचा पुनरुच्चार राज यांनी नाशिकमध्ये प्रचारादरम्यान केला होता. नाशिककरांनी राज यांच्या पक्षाकडे सत्ता नसली तरी सत्तेची सूत्रे मात्र सोपवली आहेत. त्यामुळे त्यांनी आता घेतलेल्या भूमिकेवर पुढच्या पाच वर्षांच्या कारभाराचे भवितव्य ठरणार आहे. नाशिककरांनी राज यांच्याकडे सोपवलेली भूमिका त्यांना मोठ्या नैपुण्याने वठवावी लागणार आहे.

नाशिक महापालिकेत दोन्ही काँग्रेस मिळून ३८ तर युतीकडे ४० संख्याबळ आहे. त्याखालोखाल १२ जागांचा पक्ष मनसे हाच आहे. त्यामुळे उरलेल्या पाच पक्षांची आणि दहा अपक्षांची मोट बांधण्यापेक्षा काँग्रेस आघाडी किंवा युती यांना मनसेची एकगठ्ठा १२ मते खुणावत आहेत.

सत्तेसाठी भाजप हा शिवसेनेशी युती तोडणार नाही आणि मनसे शिवसेनेला पाठिंबा देणार नाही, ही बाब गृहित धरूनच काँग्रेस आघाडी मनसेशी सूत जुळवून सत्ता हस्तगत करेल असे दिसते. त्यादृष्टीने काँग्रेस आघाडी आणि मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेचे खलिते धाडण्यात आले आहेत. त्याचसोबत काँग्रेसने 'महापौर आमचाच' असा पवित्रा जाहीर करून टाकला आहे. पक्षाची पहिलीच निवडणूक असून, मिळालेल्या यशामुळे मनसेची राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याची महत्त्वाकांक्षा जागृत होण्याची शक्यता आहे. असे झाले तर पालिकेतील सर्व सत्तास्थाने आणि पाठिंब्याच्या बदल्यात हा पक्ष महापौरपदावर दावा सांगू शकतो. तसेच काही अपक्ष, छोट्या पक्षांना स्वत:कडे वळवून दबावगटाचे तंत्रही अवलंबू शकतो.
 
posted by Rohit at 9:02 AM | Permalink |


0 Comments: