महाराष्ट्र पादाक्रांत करीनच!... राज साहेब.
Monday, January 29, 2007

अवघ्या जगाला हेवा वाटावा , एवढा माझा महाराष्ट्र मोठा बनवीन , अशी प्रतिज्ञा करीत युवानेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्कवरील विराट सभेत स्वत:ला महाराष्ट्राला समर्पित केले. ' महाराष्ट्र माझा , मी महाराष्ट्राचा ' या घोषणेचा पुनरुच्चार करून राज यांनी महाराष्ट्राच्या हिताआड येणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी तडजोड करणार नसल्याचे ठामपणे सांगितले. प्रगत , आधुनिक महाराष्ट्राचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पादाक्रांत करून दाखवीनच , असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

राज यांचे काका , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कावरील गाजलेल्या सभांची आठवण करून देणारी प्रचंड गर्दी , तरुणांचा जल्लोष , फटाक्यांची आतषबाजी , झेंड्यांचा , फलकांचा महासागर , वाद्यांचा महागजर अशा भारलेल्या वातावरणात राज यांच्या पक्षाची ही पहिलीवहिली सभा झाली. राज यांनी शिवसेनाप्रमुखांच्याच शैलीत तरुणांच्या शिक्षण आणि नोकरीसारख्या प्रश्ानंचा ऊहापोह केला आणि तेच आपला ' टागेर्ट ऑडियन्स ' असल्याचे दाखवून दिले.

मुंबईतील आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी रस्ते , लोकलप्रवास आदि मुंबईच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना त्यांनी हात घातला आणि महापालिकेचे 12 हजार कोटींचे बजेट कंत्राटदारांच्या खिशात जाऊ देणार नाही , असा निर्धार व्यक्त केला. राज्यातील प्रश्ानंबाबत मंत्र्यांबरोबर सरकारी अधिकाऱ्यांनाही यापुढे जाब विचारला जाईल , असे ते म्हणाले.

धर्मजातीच्या राजकारणापासून शेतीपर्यंत अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या जवळपास 55 मिनिटांच्या जोशपूर्ण भाषणात राज यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या विद्यमान सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर तुफान टीका केली. महाराष्ट्रातील शेतीही ' ग्लॅमरस ' करून दाखवण्याचा विडा उचलला.

शिवाजी पार्क उभे आडवे भरून टाकणाऱ्या जनसमुदायासमोर उभे राहिलेले राज सुरुवातीलाच भावुक होत म्हणाले की , लहानपणापासून शिवसेनाप्रमुखांबरोबर या मैदानावर शिवसेनेच्या सभांना येत होतो , पण आपण स्वत: पक्ष स्थापन करू , याच मैदानावर भाषणाची वेळ येईल , असे वाटले नव्हते. 66 साली काकांनी शिवसेना स्थापन केली , तेव्हा आपले आजोबा हजर होते. ' हा बाळ या क्षणाला मी महाराष्ट्राला अपर्ण करीत आहे ', असे ते म्हणाले होते. आपल्यामागे कोणी नाही , तेव्हा आपणच स्वत:ला महाराष्ट्राला समपिर्त करीत आहोत , असे राज यांनी जाहीर केले , तेव्हा जनसमुदायातून भावनेची लाट उसळली.

कार्यर्कत्यांच्या बळावरच आपण नवा पक्ष स्थापन करण्याची हिंमत करू शकलो , असे सांगून राज यांनी पक्षाचे पहिले धोरण जाहीर केले... ' कोणीही कोणाच्याही पाया पडायचे नाही! '... शिवसेना संस्कृतीशी आपली ' सेना ' काही अंशी फारकत घेणार आहे , असेच त्यांनी सूचित केले. त्याचप्रमाणे ' काँग्रेसी ढोंगीपणा ' न करता आपल्या पक्षात मुस्लिम आणि दलितांनाही ' योग्य ' स्थान दिले जाईल , असेही त्यांनी स्पष्ट केले.

काही धर्मांधांमुळे आपण ' त्यां ' च्यातील चांगली माणसे नाकारायची का , अब्दुल कलाम आणि इरफान पठाण नाकारायचे का , असा सवाल त्यांनी केला. मात्र , कोणत्याही समाजापुढे लांगूलचालन करणार नाही , निवडणुका आल्या म्हणून ' टोप्या ' घालणार नाही , असेही त्यांनी निक्षून सांगितले. मोहंमद पैगंबरांचे चित्रच नाही , तर व्यंगचित्र कसे काढले , असा सवाल करून राज यांनी या प्रश्ानवर आपण मुस्लिमांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही धर्माचा अपमान करणे चुकीचेच आहे , असे सांगून राज म्हणाले की , एम. एफ. हुसेन यांनी हिंदू देवतांची आणि भारतमातेची नग्नचित्रे काढली , त्याच्या निषेधार्थही मुस्लिमांनी एवढाच तीव्र निषेध करायला हवा.

दलित नेत्यांना निवडणुकांपुरतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात , असे सांगत या नेत्यांवर राज यांनी टीकेची तोफ डागली. ज्या देशात नोकऱ्याच नाहीत , तिथे आरक्षणे देऊन , नामांतरे करून , सामान्य जनतेच्या भावना भडकावण्याचेच काम या नेत्यांनी केले आहे , असे सांगून राज म्हणाले , ' माझ्या पक्षाच्या धोरणात नामांतरं नाहीत , हे सगळं झूट आहे. जनतेपुढचे खरे प्रश्ान् पोटापाण्याचे आहेत.
 
posted by Rohit at 3:28 AM | Permalink |


0 Comments: