शिवाजी पार्क... ठाकरे... आणि तरुणाई!
Monday, January 29, 2007
शिवाजी पार्कवर 30 ऑक्टोबर 1966 मध्ये शिवसेनेची, तर त्यानंतर तब्बल चार दशकांनी म्हणजेच रविवारी 19 मार्च 2006 ला महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना... या मधल्या काळात जमाना बराच बदलला... मात्र तरीही इतिहासाची पुनरावृत्ती केली ती एकाच त्रिसूत्रीने! ती म्हणजे 'शिवाजी पार्क', 'ठाकरे' आणि सळसळती 'तरुणाई'!

राज यांच्या सभेसाठी दुपारपासूनच लाखो पावले शिवाजी पार्कच्या दिशेने वळत होती. गदीर्चे वय 14 ते 30 भोवती घोटाळणारे... महिलांचे प्रमाण डोळ्यात भरणारे आणि भगवे, निळे, पांढरे आणि हिरवे झेंडे फडकवणाऱ्या तरुणांच्या जोशाने भारलेलं वातावरण! माहीम ते परळपर्यंत रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्या गदीर्च्या भव्यतेची साक्ष देत होत्या. काही गाड्या कोहिनूर कंपाऊंडमध्येही लागल्या होत्या. सायंकाळी पाचपर्यंत गदीर्ने उच्चांक गाठला. औरंगाबाद, सांगली, अहमदनगर, पुणे आदी ठिकाणांहून झुंडीने येणाऱ्या कार्यर्कत्यांच्या समुदाने शिवाजी पार्क तुडुंब भरणार, यात शंकाच नव्हती.

राज राहत असलेल्या 'कृष्णभवन'वर फडकणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आणि इमारतीजवळची गदीर् अनेकांचे लक्ष वेधत होती. आपला नेता कधी बाहेर पडणार, या प्रतीक्षेत असणाऱ्या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. केवळ निळा, तसेच हिरवा रंगाचा झेंडा घेऊन आलेल्या तरुणांचा जमाव अस्तित्व लपवू शकत नव्हता.

सांगलीमधून आलेल्या तरुणांच्या एका मोठ्या गटाने पक्षाच्या झेंड्याच्या रंगाचे टी शर्टच घातले होते. यामुळे गदीर्त हा गट उठून दिसत होता. यातल्या दीपक खाडे या तरुणाने सांगितले की, याआधी आपण शिवसेनेचे दहा हजारांहून भगवे टी शर्ट शिवून घ्यायचो. आता ही जुनी ओळख असल्याने दोन दिवसांतच नव्या पक्षाचे टी शर्ट शिवून मिळाले! हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहात होता.

शिवाजी पार्क परिसरात अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे, बिल्ले विकणाऱ्या तरुणांची गदीर् होती. मात्र ते विकणाऱ्यांमध्ये उत्तर भारतीय तरुण आघाडीवर होते. शिवाजी पार्कमध्ये उभारलेले भव्य स्टेज आणि शेजारचे चार प्रचंड स्क्रीन दूरवरूनही राज यांना पाहण्याची संधी देत होते.
 
posted by Rohit at 3:30 AM | Permalink |


0 Comments: