नवनिर्माणाची मुहूर्तमेढ
Monday, January 29, 2007
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 15 लाख सदस्यांचे उदिष्ट ठेवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यनोंदणीला मंगळवारपासून संपूर्ण राज्यात एकाच वेळी प्रारंभ झाला. नोंदणीच्या पहिल्या दिवशीच दोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्यासह विनय येडेकर आणि अतुल परचुरे हे अभिनेते नवनिर्माण सेनेत दाखल झाले. या सेनेचा एकाही सदस्याची नोंदणी बोगस नसेल यासाठी ' फूलप्रूफ फॉर्म ' तयार केल्याचे नवनिर्माण सेनाध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

शिवाजी पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या बूथमध्ये राज यांनी फॉर्मवर सह्या करून दुपारी सदस्यनोंदणीचे उद्घाटन केले. त्याचवेळेस संपूर्ण महाराष्ट्रात सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज म्हणाले , सदस्यनोंदणीचे कोणतेही उद्दिष्ट ठेवलेले नाही. संपूर्ण राज्यातूनच सदस्यनोंदणीसाठी चौकशी होत आहे , त्यावरून सदस्यनोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे. एकट्या नगर जिल्ह्यातून एक लाख फॉर्मची मागणी आहे. किती नोंदणी झाली याची निश्चित माहिती 15 दिवसांत पूर्णपणे मिळेल. मात्र या अभियानात एकही बोगस नोंदणी होणार नाही याची काळजी घेतली आहे. फॉर्ममधील संपूर्ण माहितीची संगणकावर नोंद करण्यात येणार आहे.

फॉर्ममध्ये सदस्यांच्या जातीची माहिती विचारण्यात आली आहे. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले , राज्यातील काही मतदारसंघ राखीव आहेत. त्यामुळे संभाव्य उमेदवारीची महिती असावी म्हणून या कॉलमचा समावेश केला आहे. पक्षाच्या दोन कार्यर्कत्यांमध्ये झालेल्या मारामारीबद्दल विचारले असता ते म्हणाले की , पक्षशिस्तीसाठी आचारसंहिता केली आहे. ही प्राथमिक सदस्यनोंदणी असून त्यानंतर सक्रीय सदस्यनोंदणीला प्रारंभ होईल. सक्रीय सदस्याच्या चार पानी फॉर्म असेल.

अतुल सरपोतदार म्हणाले की , राज्यात 14 लाख फॉर्म वितरित केले आहे. मुंबईत साडेपाच लाख फॉर्म वितरित झाले आहेत.
 
posted by Rohit at 3:52 AM | Permalink |


0 Comments: