मन से
Monday, January 29, 2007
डोळे आणि कान यात चार बोटांचं अंतर असतं. माझ्याबाबतीत चार दशकांचं अंतर असल्याचा दाखला मला काही दिवसांपूर्वी मिळाला. दचकू नका, मी खरंच बोलतोय. चार दशकं म्हटल्यावर माझ्या वयाचा चुकीचा अंदाज बांधायचीही गरज नाही. मी 32 वर्षांचा आहे!! त्या ऐतिहासिक घटनेला मात्र चार दशकं उलटून गेली आहेत. समजायला लागल्यापासून त्याच्या कहाण्या ऐकत आलोय.

शिवसेना या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेला चार दशके उलटून गेली. याची आठवण व्हायचं कारण की, परवा 19 मार्च रोजी शिवतीर्थावर झालेल्या सभेला मी उपस्थित होतो आणि त्याच शिवतीर्थावर झालेल्या पहिल्या शिवसेनेच्या सभेला माझे आजोबा शाहीर साबळे उपस्थित होते. चार दशकात तीन पिढ्यांचं अंतर होतं. फरक फक्त इतकाच की, शिवसेनेच्या पहिल्या सभेला आजोबा व्यासपीठावर होते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेला मी व्यासपीठासमोरच्या रांगेत बसलो होतो.

आजही आमचे बाबा रंगात आले की, संयुक्त महाराष्ट्राच्या आठवणी सांगतात आणि मग हमखास विषय शिवसेनेच्या स्थापनेवर येतो. 'आंधळ दळतयं' या नावाचं मुक्तनाट्य त्या काळात फारच गाजलं होतं. मराठी माणसाच्या वेदनेचं आणि त्याच्या चुकीच्या वागण्याचं त्या काळातलं ते परिमाण होतं, असं त्याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माझ्या समवयस्क पिढीला हे मुक्त नाट्य माहीत नसेलही आणि माहीत असण्याचं कारणही नाही. मी शाहिरांचा नातू म्हणून त्यांचा बायोडेटा मला पाठ आहे. मी नसतो तर मलाही त्या मुक्तनाट्याची फारशी माहिती नसती आणि माहिती करून घेण्याची इच्छाही नसती!! (आमच्या पिढीचा हाच तर दोष आहे. चांगल्याची जाण नाही आणि वाईटाला वाण नाही.)

शिवसेनेसारखी ज्वलंत संघटना उभी राहिली ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी. गेली चार दशकं आपण मराठी माणसं, ती संघटना आहे म्हणून तरलो. 'अरे आवाज कुणाचा ' म्हटलं तरी 'शिवसेनेचा' हा शब्द लगेच बाहेर पडतो. त्याला बाळासाहेब ठाकरे नावाचा करिश्माच कारणीभूत आहे.

अजूनही आमचे बाबा त्या काळातल्या आंदोलनांच्या आठवणी सांगतात. मंुबईतली ती दंगल आणि मग त्या नंतर शिवसेनेचं कार्य, याचं यथार्थ वर्णन करतात. काय, मराठी माणसात एवढी रग होती? असा प्रश्न पडावा अशा काही घटना आहेत. त्यांनी शिवसेनेच्या पहिल्या सभेचं वर्णन केलं तेव्हा आधी अतिश्योक्ती वाटायची. एवढी गदीर् कधी होते का? असा प्रश्न पडायचा. पण नंतर दर दसरा मेळाव्याला त्या गोष्टीचं प्रत्यंतर येऊ लागलं. मी कधी सभेला हजर नसायचो. पण दुसऱ्या दिवशीच्या पेपरात फोटो पाहिल्यावर खात्री पटायची. बाप रे, एवढी गदीर् होते बाबा!! गदीर्, त्या गदीर्ला आदेश देणारे ते बाळासाहेब ठाकरे. चुंबकीय शक्ती काय असते, ते त्यांच्याकडे पाहून आपसूक समजतं. पण या झाल्या सगळ्या ऐकीव गोष्टी. डोळे आणि कान यात चार बोटांचं अंतर असतं!!

ते अंतर परवाची सभा पाहिल्यावर एकदम कमी झालं. राज ठाकरे नावाचा करिश्मा त्या सर्व इतिहासाला कारणीभूत होता. आम्हा कलावंतांचा राजकारण्यांशी फारसा संबंध येत नाही. (आलाच तर तो दहा टक्क्यांची जागा मिळवणं, सेन्सॉर बोर्डावर सभासद होणं, दरवषीर् न चुकता संमेलनात सरकारला नव्या गोष्टींची मागणे करणं वगैरे वगैरे...) माझा राज ठाकरे या व्यक्तीशी संबंध आला तो एक कलाकार म्हणून. मी लिहिलेली-दिग्दशिर्त केेलेली बहुतांशी नाटकं त्यांनी पाहिली आहेत. त्या अनुषंगाने आमची भेट झाली आणि मी त्या कलाकार माणसाच्या प्रेमात पडलो. व्यंगचित्रकार म्हणून परिचित असलेले राज ठाकरे, संगीत-चित्रपट-साहित्य या सर्वांमध्येही अव्वल आहेत, हे त्यांच्याशी चर्चा केल्यावर कळलं. त्या चचेर्त आमच्याशी (मी, अंकुश, भरत) बोलताना राजकारण हा विषय कधीच नसतो. फक्त कलाकार या नात्याने केलेलं कौतुक आणि वेळोप्रसंगी दिलेले सल्लेच असतात.

राजकारणात आलेल्या स्थित्यंतरानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. जवळजवळ चार महिने थांबून पूर्ण विचारांती त्यांनी नवा पक्ष काढला. परवा महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा ट्रेलर त्यांनी सभेत दाखवून दिला. ती गदीर् कुठल्याही अपेक्षेने आली नव्हती. फार झालं आता. कोणीतरी आशेचा किरण दाखवावा इतकीच अपेक्षा होती. गदीर्त बहुतांशी तरुणच होते आणि ते कुठल्याही अमिषाला बळी पडून आलेले नव्हते. (जवळपास निवडणुकाही नाहीत, तर अमिष कसलं डोंबलाचं असणार?)

त्या दिवशी गल्लीच्या एका कोपऱ्यात गाडी पार्क करून, अंकुश-भरतसोबत दोन किमीची पदयात्रा करत सभेच्या ठिकाणी पोहोचलो. व्यासपीठावरून ते बोलत होते आणि मला बाबा आठवत राहिले. शिवसेनेच्या पहिल्या सभेचं जे वर्णन ऐकलंय, त्याचा अॅक्शन रिप्ले पाहतोय असं वाटत राहिलं. फरक फक्त मुद्द्यांचा होता. तेव्हा आणि आताच्या परिस्थितीचा होता. खरंच, स्वातंत्र्य मिळवून इतकी वर्ष झाली तरी अजूनही आपण चार मुद्द्यांवरच निवडणुका लढवतोय. अन्न-वस्त्र-निवारा-रोजगार! म्हणजे इतकी वर्ष काहीच घडलं नाही तर. त्यांनी मुद्दे मांडले. त्या मुद्द्यांवर कार्यवाही होईल याची मला खात्री वाटते.

सभेनंतर प्रतिक्रिया सांगणारे बरेच फोन आले. लोकांच्या प्रश्नांवर हसावं की रडावं समजेना? आपल्या आजूबाजूला काही घडत नाही, म्हणून आधीच आपण आरडाओरडा करतो. आता काही घडू पाहतंय, तर असं करून काय होणाराय? म्हणून आरडाओरडा करतोय. एक तरुण नेता काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतोय तर, हे शक्यच नाही असं, काही लोकं ठणकावून कसं काय सांगू शकतात? 'कालाय तस्मै नम:' आपण सर्व काळावर सोडूया. तोच सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. पण एक मात्र खरं, त्यांनी एकट्याने विचार मांडून काडीचाही उपयोग होणार नाही. त्या विचारांना आपणही थोडंसं पुढे नेण्याचं काम करायचं आहे. पक्ष कुठलाही असला, तरी समस्या सगळ्यांनाच भेडसावणाऱ्या आहेत. आत्ताच त्यावर जालीम उपाय शोधला नाही तर... तर मात्र येणारी पिढी आपल्याला दूषणं देईल. राजा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे, अशी म्हण आहे. राजा जागा झालाय, आता प्रजेचीही तेवढीच जबाबदारी नाही का?

- केदार शिंदे
 
posted by Rohit at 3:37 AM | Permalink |


3 Comments:


At February 23, 2007 at 12:29 PM, Blogger prasanna

फारच सुंदर लिहीले आहे.मलाही महाराष्ट्र नवनिर्माण हा विषय आणि ही सेना याबद्दल आपुलकी वाटत आहे.त्यासाठी internet media मधुन काम करण्यास काही मार्गदर्शन मिळेल का?
प्रसन्ना

 

At February 1, 2008 at 4:10 AM, Blogger Unknown

This comment has been removed by the author.

 

At February 1, 2008 at 4:11 AM, Blogger Unknown

मन से च्या सर्व कार्यकार्त्यानी विचाराची देवान घेवान करण्या साठी इन्टरनेट हा चांगला माध्यम वापरला आहे. ते खरच कोतुकास्पद आहे. म्हणूनच आम्ही मन से चे व मन से आमचा. बोलो मन से कहो दिल से.

अविनाश जोशी नांदेड.