राजच्या राज्यात...
Monday, January 29, 2007
बाळासाहेबांचा वारसा!

राज यांच्या पक्षाच्या पहिल्या सभेची तुलना अपरिहार्यपणे त्यांच्या काकांच्या शिवसेनास्थापनेच्या सभेशी होत राहील. राज यांच्या वागण्याबोलण्यात शिवसेनाप्रमुखांची ढब प्रकर्षाने दिसत आलेली आहेच, आपल्या पहिल्या 'स्वतंत्र' सभेतही राज यांनी हा 'वारसा' जपला.

सभेच्या सुरुवातीलाच खास 'सेना स्टायली'त फटाक्यांची आतषबाजी झाली, तेव्हा ते बाळासाहेबांप्रमाणेच 'जाहीर' वैतागून म्हणाले, हे चायनीज फटाके चिनी माणसांप्रमाणेच आहेत... थांबतच नाहीत.

त्रिशूळ, ढाल, तलवारी

पुढे, 'राज ठाकरे हा ज्वलंत नेता आहे. त्याच्या पक्षाचं नाव तेवढं आक्रमक वाटत नाही,' अशी टीका करणाऱ्यांना उद्देशून ते गरजले, 'मी आक्रमक आहे म्हणून आता काय माझ्या मुलांची नावं त्रिशूळ, ढाल, तलवारी अशी ठेवू?'

' पवार्रर्र' गजराचं घड्याळ

आपण शिवसेनेतून बाहेर पडलो, तेव्हा झालेल्या चविर्तचर्वणाचा समाचार घेताना राज म्हणाले, मी काय करणार याची बाकीच्यांनाच जास्त चिंता होती. राजकारण करायचे तर लवकर जागे व्हावे लागते, लोकांना भेटावे लागते, या शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्याच्या अनुषंगाने ते म्हणाले, आता मी लवकर उठतो. नवं घड्याळ आणलेलं आहे गजराचं. ते 'पवार्रर्रर्रर्र' असा गजर करतं!

चावटिका

शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाप्रमाणेच राज यांनीही भाषणात अर्थवाही 'असंसदीय' भाषेचा पुरेपूर वापर केला. आपल्यात बदल घडले आहेत, याबद्दल 'खंत' व्यक्त करणाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, बदल हे प्रगतीचं लक्षण आहे. तुम्ही एक वर्षाचे असताना 'गादी ओली' करीत होतात, (राज यांचे शब्द अधिक 'थेट' होते) अजूनही तेच करता का?

मुंबईतील आरक्षित भूखंड विकू देणार नाही, असे निक्षून सांगताना राज यांनी तसा प्रयत्न करणाऱ्यांचे काय होईल, हे एकाच वाक्यात सूचित केले. 'या मैदानात जेवढे बांबू घातलेत ना...' या अर्ध्याच सोडलेल्या वाक्यातून राज यांनी व्यक्त केलेला आशय श्ाोत्यांमध्ये आरपार पोहोचला.

हसमुखराय, हसमुख चाय

राज ठाकरे यांच्या तोफखान्यातून प्रस्थापित राजकीय नेते सुटले नाहीत. मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना भांग पाडण्यापलीकडे काही येत नाही, असा टोला लगावून राज यांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची संभावना 'हसमुख राय की हसमुख चाय' अशी केली. 'फुलाफुलांचे शर्ट घालणारे' दलित नेते रामदास आठवलेंच्या तोंडातल्या तोंडात गुरगुरत बोलण्याची फर्मास नक्कल केली. मात्र, राज यांनी भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याची 'आठवण' काढली नाही, हे राजकीयदृष्ट्या अन्वर्थक मानले जात आहे.

' टोल फ्री' नवनिर्माण

मुंबई-पुणे दुतगती महामार्गावर रविवारी देहू रोड टोल नाक्यावर (टोल भरला नाही अशी सूचना देणारा) सायरन सतत वाजतच होता, टोल न भरता जाणाऱ्या एवढ्या गाड्या कोणाच्या असा स्वाभाविक प्रश्ान् इतर चालकांना पडत होता... कारण राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या सभेला जाण्यासाठी पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून निघालेल्या सुमारे 400 गाड्या रविवारी टोलला फाटा मारत मुंबईकडे रवाना झाल्या.

बारामतीच्याही शेतकऱ्यांचा पक्ष

शिशिर शिंदे यांनी नवनिर्माण सेनेच्या सर्वसमावेशकतेचे वर्णन करताना, हा शेतकऱ्यांचाही पक्ष आहे, असे सांगितले... थोडे थांबून 'बारामतीच्या शेतकऱ्यांचेही' असा जोड त्यांनी दिला, तेव्हा एकच हंशा पिकला. काँग्रेसच्या राजवटीत राज्याची स्थिती किती बिघडली, हे सांगताना ते म्हणाले की, काँग्रेसला शक्य असते, तर त्यांनी सूर्यप्रकाशाचेही लोडशेडिंग केले असते.
 
posted by Rohit at 3:33 AM | Permalink |


0 Comments: